"मुघलांच्या तोफांपुढे न झुकता रणभूमीत मृत्यूला आलिंगन देणारी गोंडराज्याची शूर वीरांगना — राणी दुर्गावतींचं देशासाठीचं अजरामर बलिदान"

"A Fearless Warrior Queen of Gondwana Who Embraced Death on the Battlefield Rather Than Bow Before Mughal Cannons — The Immortal Sacrifice of Rani Durgavati for Honor"

राणी दुर्गावती यांचा जन्म ५ ऑक्टोबर १५२४ रोजी उत्तर भारतातील कालिंजर किल्ल्यात झाला.

 त्या चंदेल वंशात जन्मलेल्या होत्या. चंदेल वंश हे मध्यभारतामधील एक प्राचीन क्षत्रिय वंश होतं, ज्यांनी खजुराहोचे प्रसिद्ध मंदिर उभारले होते. त्यांच्या वडिलांचं नाव कीर्तिसिंह होतं. दुर्गावती लहान वयातच शस्त्रविद्येत प्रशिक्षित झाल्या. घोडेस्वारी, धनुर्विद्या, मल्लयुद्ध अशा क्षेत्रांत त्या पारंगत झाल्या.

राणी दुर्गावती (ऑक्टोबर ५, १५२४ - जून २४, १५६४) यांचा जन्म प्रसिद्ध राजपूत राजा चंडेल सम्राट किरत राय यांच्या कुटुंबात झाला. कालंजर किल्ला (बांदा, उत्तर प्रदेश,भारत) हे त्यांचे जन्मस्थान होय. महंमद गझनी याला पळता भुई थोडी करणाऱ्या राणा विद्याधर यांचा बचाव करण्यामुळे चंदेल राजघराणे इतिहासात प्रसिद्ध झाले. राणा विद्याधर यांच्या शिल्पकलेवरील प्रेमाची प्रचिती जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर व कालंजर किल्ल्याकडे पाहून येते. राणी दुर्गावती यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या वंशपरंपरगात धैर्य व कलाभक्तीच्या परंपरेला आणखी प्रतिष्ठा लाभली. 


१५४२ साली दुर्गावती यांचा विवाह गोंडवाना राज्याचे युवराज दलपतशाह यांच्याशी झाला. गोंडवाना हे गोंड आदिवासी राजवंशाचं राज्य होतं.

 त्या काळी मध्य भारतातील हे एक बळकट राज्य होतं. विवाहानंतर काही वर्षांनी १५५० मध्ये दलपतशाह यांचं निधन झालं. त्यांचा मुलगा वीरनारायण हा फक्त पाच वर्षांचा असल्यामुळे राणी दुर्गावती यांनी राज्यकारभार स्वतःकडे घेतला.


राणीने राज्याची प्रशासकीय व्यवस्था सक्षम ठेवली. त्यांनी राजधानी गरा-काटा ( जबलपूर जिल्ह्यात) स्थापन केली. तलाव बांधणी, शेतीसाठी पाण्याची व्यवस्था, महसूल संकलन आणि प्रजेसाठी न्यायप्रक्रिया यामध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातलं.

 त्यांचा दरबार सुशासनासाठी ओळखला जात होता. त्या नियमितपणे दरबारात बसत आणि राज्याच्या संरक्षणासाठी लष्कर व्यवस्थापन करत.



मुघल सम्राट अकबरच्या काळात, १५६४ साली त्याचा सरदार असफ खान याने गोंडवाना राज्यावर आक्रमण केलं. असफ खानने हे आक्रमण स्वतःच्या महत्वाकांक्षेपोटी केलं होतं. राणी दुर्गावतीला मुघलांच्या अधीन होण्याचा आदेश देण्यात आला, पण त्यांनी तो स्पष्टपणे नाकारला. राणीने शरण जाण्यापेक्षा प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला.

राणीने आपल्या सैन्याची संघटन केली. त्यांनी नर्रईच्या जंगलात लढण्यासाठी योग्य ठिकाण निवडलं – जिथे टेकड्या, नदी, आणि निसर्ग यांचा उपयोग होऊ शकतो. त्यांच्या सैन्यात राजपूत, गोंड व इतर स्थानिक सैनिक होते. २४ जून १५६४ रोजी नर्रई नाल्याजवळ निर्णायक युद्ध घडलं. मुघल सैन्य अधिक प्रबळ, आणि तोफखान्याने सज्ज होतं. 

आता राणीने आपल्या सल्लागारांसोबत युद्धनीतीची चर्चा केली. राणीचं मत होतं की शत्रूवर रात्री हल्ला करावा म्हणजे तो कमजोर पडेल पण राणीच्या सल्लागारांनी याला नकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी असफ खानाने अवाढव्य तोफा युद्धासाठी आणल्या. राणी आपल्या सरमन नावाच्या हत्तीवर स्वार झाली आणि युद्धाला सामोरी गेली. तिचा मुलगा राजपुत्र वीर नारायण यानेदेखील या युद्धात भाग घेतला होता. त्याने तीन वेळा मुघल सैन्याची पिछेहाट केली होती पण एके क्षणी तो जखमी झाल्यामुळे एका सुरक्षित स्थळी तो मागे फिरला. या युद्धादरम्यान राणीला देखील एका बाणामुळे कानावर जखम झाली. दुसरा बाण थेट त्यांच्या गळ्यात घुसला व त्यांची शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की या युद्धात पराभव अटळ आहे. त्यांच्या माहूताने त्यांना युद्धभूमीवरून परत फिरण्याचा सल्ला दिला पण राणीने तो मानला नाही. त्यांनी आपला खंजिर काढला व स्वतःचे जीवन संपवले.

त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला – २४ जून १५६४. त्यानंतर त्यांचा मुलगा वीरनारायणनंही मुघलांविरुद्ध युद्धात सहभाग घेतला, पण शेवटी गोंडवाना राज्य मुघल साम्राज्याच्या ताब्यात गेलं.


राणी दुर्गावती यांचं जीवन आणि बलिदान हे ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये स्पष्टपणे नमूद आहे. विशेषतः अबुल फजलच्या ‘आइन-ए-अकबरी’ मध्ये त्यांचा उल्लेख आहे. त्या काळच्या मुघल लेखकांनीही त्यांच्या शौर्याची नोंद घेतलेली आहे.


त्यांच्या स्मरणार्थ आज मध्यप्रदेशातील जबलपूर येथे राणी दुर्गावती विश्वविद्यालय चालवण्यात येतं. त्यांच्या नावावर संग्रहालय, स्मारकं आणि रस्ते आहेत. १९८८ मध्ये भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केलं.

त्यांच्या जीवनाची कहाणी फक्त एका राज्याची राणी म्हणून नाही, तर इतिहासात खऱ्या अर्थानं स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या एका योद्धा स्त्री म्हणून नोंदली गेली आहे. त्यांचं जीवन आणि बलिदान या देशाच्या इतिहासातील एक ठोस, अस्सल आणि दस्तावेजीय घटना आहे, जी कोणत्याही भाष्याशिवाय सांगितली जाऊ शकते – कारण ती स्वतःच पुरेशी बोलकी आहे.



मनोगत – राणी दुर्गावती यांच्या स्मरणार्थ

इतिहासात काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात, की त्यांचं अस्तित्व केवळ एखाद्या काळापुरतं मर्यादित राहत नाही. त्यांचं कार्य, त्याग, आणि शौर्य काळाच्या सीमांनाही ओलांडून पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतं.

राणी दुर्गावती हे असंच एक तेजस्वी नाव आहे.


एक स्त्री असूनही, त्या काळात जिथं स्त्रियांना युद्ध, प्रशासन किंवा सत्ता या गोष्टींपासून दूर ठेवण्यात येत होतं, तिथं राणी दुर्गावती यांनी संपूर्ण राज्याची धुरा लीलया सांभाळली. त्यांच्या नेतृत्वात गोंडवाना राज्य फुललं, बहरलं आणि एक आदर्श प्रशासनाचं प्रतीक ठरलं.

माझ्यासाठी राणी दुर्गावती म्हणजे फक्त एक ऐतिहासिक व्यक्ति नव्हे, तर त्या संकल्प, धैर्य आणि आत्मगौरवाचं प्रतीक आहेत. त्यांनी केवळ राज्य वाचवण्यासाठी नाही, तर स्वाभिमान जपण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. ही घटना जेव्हा मी वाचली, तेव्हा मनात एकच भावना उमटली – अभिमान आणि प्रेरणा.


त्यांचं बलिदान आजही आपल्याला सांगतं की परिस्थिती कितीही कठीण असो, अन्यायासमोर झुकायचं नसतं.

आज आपण आधुनिक समाजात राहतो, अनेक अधिकार आपल्या हातात आहेत. पण हे सर्व मिळवताना अशा कितीतरी शूर वीरांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं – त्यापैकीच एक आहेत राणी दुर्गावती.

आज, त्यांच्या बलिदान दिनी, मी त्यांना केवळ श्रद्धांजली वाहत नाही, तर त्यांच्यापासून शिकण्याचा प्रयत्न करतो आहे.

त्यांचं शौर्य, त्याग, आणि आत्मबल मला माझ्या वैयक्तिक आयुष्यातही सतत प्रेरणा देतं.


जिथं सत्य, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यासाठी मृत्यूला सामोरं जाणं स्वीकारलं जातं, तिथं अशा स्त्रीचे पाय ऐतिहासिक काळ्या दगडावर नव्हे, तर आपल्याच्या हृदयात कोरले गेले पाहिजेत.


राणी दुर्गावती यांना विनम्र अभिवादन.🙏🏻🙏🏻🙏🏻



Post a Comment

0 Comments