“घंटानाद आंदोलनाने गजबजला संपूर्ण देसाईगंज शहर ; ८ दिवसांत मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन होणार, असा इशारा आमदार मसराम यांनी दिला”

Desaiganj: Farmers’ bell-ringing protest under the leadership of MLA Ramdas Masram; warning given to the government.

देसाईगंज, दि. २५ ऑगस्ट आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आज आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून शासनावरील असंतोष व्यक्त केला.

 शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना उद्देशून निवेदन दिले.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –

महायुती सरकारने दिलेल्या निवडणूक आश्वासनानुसार संपूर्ण कर्जमाफी (सातबारा कोरा) तातडीने करावी.

धान विक्रीची थकीत रक्कम (२०२४ खरीप व २०२५ रब्बी हंगाम), बोनस तातडीने अदा करावा.

कृषी पंपासाठी प्रलंबित वीज कनेक्शन, मुबलक व नियमित वीजपुरवठा करावा.

नैसर्गिक आपत्ती व जंगली प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई, पिक विम्याची रक्कम तातडीने जमा करावी.

कुरखेडा येथील सती नदीवरील अर्धवट पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे.

शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार सोलर किंवा वीज कनेक्शन पुरवठा करावा.

या प्रसंगी आमदार मसराम म्हणाले, “शेतकऱ्यांच्या समस्या दीर्घकाळ प्रलंबित असून शासनाने तातडीने तोडगा काढावा, अन्यथा शेतकरी अधिक तीव्र आंदोलनास भाग पडतील.”

शेतकऱ्यांनी शासनाला आठ दिवसांची मुदत देत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.


Post a Comment

0 Comments