"Awareness and Motivation Workshop on the Implementation of the M-Sand Policy in Gadchiroli District"
गडचिरोली : शासन निर्णय दिनांक १७ जुलै २०२५ अन्वये पर्यावरणपूरक तसेच बांधकाम क्षेत्रासाठी शाश्वत पर्याय ठरणाऱ्या कृत्रिम वाळू (M-Sand) धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत काल (१५ सप्टेंबर) नगर परिषद सांस्कृतिक भवन येथे प्रोत्साहनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाययोजना स्वीकारणे ही काळाची गरज आहे. नैसर्गिक वाळूच्या वाढत्या टंचाईला पर्याय म्हणून M-Sand चा वापर होणे गरजेचे आहे. शासनाने आखून दिलेल्या धोरणाची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे.” असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार प्रितीताई डुडूलकर, प्रभारी मुख्याधिकारी कुमरे साहेब, तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी शेख साहेब उपस्थित होते. या मान्यवरांनीही M-Sand च्या वापरासंबंधी आपली मते व्यक्त केली. जिल्हा खनिकर्म अधिकारी शेख यांनी त्यावर विस्तृत माहिती देत सांगितले की, जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला पारदर्शक आणि शाश्वत पद्धतीने वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी M-Sand धोरण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि कुत्रीम वाळू धोरणाबद्दल परिपूर्ण माहिती यावेळी त्यांनी दिली
यावेळी जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत पदाधिकारी, ठेकेदार, अभियंते तसेच खाण व्यवसायाशी संबंधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत M-Sand उत्पादन प्रक्रियेविषयी, त्याचा पर्यावरणावर होणारा सकारात्मक परिणाम, तसेच शासनाकडून दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेद्वारे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रासाठी कृत्रिम वाळूचा वापर प्रोत्साहित करून पर्यावरण संवर्धनास चालना देणे आणि विकासकामे वेगाने पार पाडणे हे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
या कार्यशाळेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील M-Sand धोरणाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होऊन नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

0 Comments